न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)
Persistent absenteeism in Phaltan Divisional Officer's office, citizen harassment

फलटण :-फलटण मंडल अधिकारी जोशी हे कार्यालयात सतत गैरहजर असल्याने तसेच त्याच्याकडील अनेक कामे प्रलंबित असल्याने नागरिक हैराण झाले असून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे अनेक त्रासलेले नागरिक तक्रार दाखल करणार आहेत.

 

फलटण मंडल अधिकारी जोशी हे नेहमीच गैरहजर राहत असतात अशा नागरिकांच्या तक्रारी होत आहेत. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्व सामान्य जनतेचे कामकाज होत नसल्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे व त्यांच्या हाल अपेष्टा होवून निराश होवून परत जावे लागत आहे या गोष्टीचे भान मंडल अधिकारी जोशी यांना नसल्यामुळे ते आपल्या कर्तव्यात कसूर करत आहेत.

 

मंडल अधिकारी जोशी यांच्याकडे या फलटण, कोळकी, जाधववाडी, गावाची जबाबदारी असून या गावातील नागरिक महसूल विषयक विविध कामाकरिता लाखो रुपये खर्च करून बांधलेले फलटण शहरातील फलटण मंडल अधिकारी कार्यालयात येत असतात परंतु या कार्यालयातील मंडल अधिकारी कक्षात आजअखेर मंडल अधिकारी जोशी यांना काम करताना कोणत्याही नागरिकांनी पाहिले नसून ते नक्की कोणत्या ठिकाणी बसून काम करत असतात हे आजून तरी कोणाला समजले नाही. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मिटींगमध्ये फक्त हजर असणारे मंडल अधिकारी जोशी हे मंडल अधिकारी कार्यालयात गैरहजर असतात. 

 

विविध प्रकारचे जमीन चौकशी अहवाल, दाखले, जमिनीच्या नोंदी,सातबारा दुरुस्ती यासारख्या अनेक कामाकरिता मंडळ अधिकारी जोशी यांची भेट घेण्याकरिता नागरिक मंडल अधिकारी कार्यालयात हेलपाटे मारतात दिसत असून कार्यालयात गैरहजर असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मंडलातील सर्व तलाठी आपापल्या मुख्यालयी कायम वास्तव्य करीत असल्याचे पाहण्यास मंडल निरीक्षक जबाबदार असतात पण मंडल अधिकारी जोशी हे मुख्यालयी कायम वास्तव्य करीत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.

 

मंडल अधिकारी यांनी वर्षभरात आपल्या मंडलातील प्रत्येक गावाची संपूर्ण तपासणी केल्या आहेत का?, विविध महसूल विभागाकडून प्राप्त टपाल मुदत कालावधीत निर्गद केले आहेत का?, मुदत कालावधीत फेरफार मंजूर केले आहेत का?, मुदत कालावधीत सुनावणी झाल्या आहेत का तसेच सदर प्रकरणात निकाल देण्यात आले आहेत का?, वरिष्ठ महसूल अधिकारी यांनी दिलेल्या सर्व आदेशानुसार प्रत्यक्षात कार्यवाही करण्यात आली आहे का?, मंडल अधिकारी हे मुख्यालयी कायम वास्तव्य करत आहे का? या सर्व बाबींची तपासणी व चौकशी प्रत्यक्षात तहसीलदार यांनी करण्याची आवश्यकता असून दोषी मंडल अधिकारी जोशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

 

मंडल अधिकारी जोशी यांच्याविरोधात नियमबाह्य नोंदी, बेकायदेशीर बिनशेती अहवाल, तुकडे बंदी जमीन नोंदी, वादग्रस्त निकाल अशा अनेक तक्रारीवर आजअखेर महसूल विभागाकडून कारवाई झाल्या नसून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दखल घेऊन स्वतः कारवाई करण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा