न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

 

     फलटण : महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आणि भूतपूर्व फलटण संस्थानचे २८ वे अधिपती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनंत मंगल कार्यालय आणि त्यांच्या लक्ष्मी विलास पॅलेस या निवासस्थानी फलटण शहर आणि तालुक्यासह माण, खटाव, खंडाळा, वाई, पाटण, कराड, माळशिरस, सांगोला तालुक्यांसह संपूर्ण सातारा जिल्ह्यातून विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, कामगार, अधिकारी, कर्मचारी यांची मोठी गर्दी उसळली होती.

      पाऊसमान कमी झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत नदी, नाले, तलाव कोरडे पडले आहेत, धरणातील पाणी साठे पिण्याच्या पाण्याची गरज भागवतील इतके मर्यादित राहिले आहेत, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, त्या पार्श्वभूमीवर यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवून तसे आवाहन करताना आपण या, एकमेकांशी सुख दुःखाच्या गोष्टी करु, दुष्काळावर मात करण्यासाठी आपली एकजूट भक्कम करु असे आवाहन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले होते, त्या पार्श्वभूमीवर अक्षरशः जनसागर लोटला, प्रत्येकाने येताना आगामी शैक्षणिक वर्षाचा विचार करुन गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, शालेय साहित्य आणून आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द केले.

    यावेळी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर वगैरेंनी गावोगावचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच यांच्याशी चारा, पाणी टंचाई आणि त्याबाबत सुरु असलेले टँकर, जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता, चारा डेपो सुरु करण्याबाबत माहिती घेऊन चर्चा केली, योग्य नियोजन करण्याची ग्वाही दिली.

     दुष्काळाची चर्चा होताना आगामी लोकसभा निवडणूक विशेषतः माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीचा तिढा अद्याप सुटला नसल्याने त्या पार्श्वभूमीवर दिग्गजांची उपस्थिती, त्यांनी एकमेकांशी केलेली चर्चा, आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशी या दिग्गजांनी केलेली बातचीत यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीच्या चर्चाही पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये चांगल्याच रंगल्याचे दिसून आले.

    दरम्यान राज्य भरातून विविध मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे संपर्क करुन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्यामध्ये उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा, खासदार, आमदार वगैरेंचा समावेश होता.

      सातारा जिल्ह्यातून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई व त्यांचे खटाव तालुक्यातील सहकारी, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा परिषद व अन्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य, नेते, कार्यकर्ते यांचा समावेश होता.

    सातारा जिल्ह्यातील व तालुक्यातील अनेक दिग्गज पत्रकारांनी आ. श्रीमंत रामराजे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, तर विविध दैनिक व साप्ताहिकाच्या वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन या निमित्ताने आ. श्रीमंत रामराजे व श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा